शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार फूटपाथ रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, दोन किमी फूटपाथवर तब्बल 38 कोटी रुपयाची उधळपट्टी करण्यात येत आहे. विशेषता: भाजप आमदारांच्या नातेवाईकांना हा उप ठेका दिला असून नातेवाईकांना पोसण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, फूटपाथचे रुंदीकरण केल्याने रस्ता अरुंद होवून वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्या फूटपाथला ‘सोन्या’चा मुलामा लावणार का? असा सवाल भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपस्थित करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
महापालिकेच्या बी.आर.टी.एस. विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार फूटपाथ विकसित करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे 37 कोटी 87 लाख 87 हजार 181 इतका खर्च लागणार आहे. बीआटीच्या बाजूने 650 मी.मी. रुंदीच्या जागेत हिरवळ विकसित करणे, स्टॅम्प काॅक्रीटचा सायकल पथ तयार करणे, पदपथ तयार करणे, बोगनवेल लावणे, पावसाळी गटारीचे चेंबर हे मुख्य रस्त्यातून स्थलांतरित करणे आणि सेवा वाहिनी डी.डब्लू.सी पाईप टाकून स्वतंत्ररित्या डक्ट विकसित करण्यात येणार आहे. सांगवी फाटा ते रावेत चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईनने तीन टप्यात कामे होणार आहे.