शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील नगरसेवकांची संख्या दहा टक्क्यांनी वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या कायद्यातील सुधारणेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांतील नगरसेवकांच्या संख्येत बदल होणार असून पुण्यातील नगरसेवकांची संख्या ही 164 वरून 183 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या 128 नगरसेवक असून ही संख्या 142 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे देशभरात यंदा जनगणना नाही झाली. त्याचा फटका नगरसेवकांच्या संख्येला बसतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायद्यात बदल करून नगरसेवकांची संख्या दहा टक्क्यांनी वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेचे सध्याच्या नियमानुसार 30 लाखांपुढील लोकसंख्येचा विचार करता प्रति एक लाख लोकसंख्येसाठी एका नगरसेवकाची भर पडते. त्यात 30 लाख लोकसंख्येसाठी नगरसेवकांची संख्या ही 160 इतकी निश्चित असते. महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला असून, महापालिकेची लोकसंख्या ही 35 लाख 56 हजार इतकी होणार आहे. त्यामुळे या निकषानुसार महापालिकेचे नगरसेवकांची संख्या 166 असणार आहे. यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशाप्रकारे पुणे महापालिकेची नगरसेवक संख्या 183 पर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.