शबनम न्यूज | मुंबई (दि.०१ डिसेंबर) :- टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या दरम्यान ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
या दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारण, विरोधी पक्षांची एकजूटता, राज्यांच्या निवडणुका आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जातं आहे .त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक उपस्थित होते.
शरद पवारांनी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं. “ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्याच्या मागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे. उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.