शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) ;- चीफ ऑफ डिफेंस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने संरक्षण दलातील महान सुपूत्र हरपला असून त्यांनी देशासाठी दिलेले अभूतपूर्व योगदान सर्वांसाठी सतत प्रेरणादायी राहील अशा शब्दात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांना व त्यांच्या सहका-यांना श्रध्दांजली अर्पण केली.
तामिळनाडू येथील कुन्नुर या ठिकाणी हेलीकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लखबिंदर सिंह लिहुर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, स्काडन लीडर कुलदीप सिंह, विंग ऑफीसर राणा प्रताप दास, अराक्कल प्रदीप, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी साई तेजा यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांना श्रध्दांजली अर्पण करताना महापौर माई ढोरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या झामाबाई बारणे, स्वीकृत नगरसदस्य माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, तसेच महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचा-यांनी श्रध्दांजली अर्पण केली. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहका-यांबद्दल माहिती दिली.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, देशासाठी समर्पित आयुष्य जगणा-या या योध्यांनी कारगील सारख्या युध्दात गाजविलेले शौर्य आणि पराक्रम स्मरणात राहणारे आहे. आपल्या प्रदीर्घ लष्करी सेवेत जनरल बिपिन रावत यांनी देशाची संरक्षण सिध्दता मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. या त्यांच्या कार्याबद्दल जनरल बिपिन रावत यांना आणि त्यांच्या सहका-यांना अनेक शौर्यपदकांनी गौरविण्यात आले आहे असे सांगून महापौर माई ढोरे यांनी राष्ट्रसेवेबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.