शबनम न्यूज | शिरूर (दि.१३ डिसेंबर) :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत गोलेगाव रोड शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2021-2022 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ,अपंग आदी प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थींनी ही बाहेरगावची परंतु शिरूरमध्ये शिक्षण घेणारी असावी. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलीचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे व विद्यार्थींनीचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र देखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.
शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदीकरिता रक्कम आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.
कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतु शिरूर जि. पुणे परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन गृहपाल श्रीमती आर.व्ही.साखरे यांनी केले आहे.