शबनम न्यूज : पुणे (दि.१६ डिसेंबर) :- आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी महाराष्ट्र उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अजित पवार यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांचे पक्षात स्वागत केले. तसेच उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, रुपालीताई यांचा राजकीय प्रवास मागील अनेक वर्षांपासून पाहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करताना अनेक सामाजिक प्रश्नांवर लक्ष दिले आहे. पण मनसे पक्षाने दुजाभाव करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले. गर्भवती असतानाही त्यांनी मनसे पक्षाचा प्रभाव पुणे शहरात वाढविण्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या उल्लेखनीय कामाला डावलले गेले.
आदरणीय शरद पवार साहेबांनी महिलांना मिळवून दिलेल्या आरक्षणातूनच आपल्या पक्षात आपण अनेक महिलांना संधी देऊ शकलो. यातूनच खा. सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, रुपाली चाकणकर अशा अनेक भगीनींना राजकीय वाटचालीत आपण पुढे आणू शकलो. अशाच प्रकारे रुपाली पाटील ठोंबरे यांनादेखील पक्ष योग्य ती जबाबदारी देईल, असा विश्वास अजितदादांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रुपाली ठोंबरे यांच्यासह लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांचेही अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले.