निगडी सिग्नलचा वाहतूक प्रश्न अधिनियम २०५ अंतर्गत समस्या सुटण्यासाठी प्रयत्नशील
निगडी सिग्नलची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बजाज ऑटो कंपनी जागा घ्यावी- नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांची मागणी
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- निगडी चौक येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी बजाज ऑटो कंपनी कडून जागा घेण्यासाठी नगरसेवक प्राध्यापक उत्तम केंदळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.
नगरसेवक प्रा केंदळे यांनी पत्रात म्हटले आहे की, शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे.वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसोबतच ठिकठिकाणी केले जाणारे बेकायदा पार्किंग,कमकुवत सिग्नल यंत्रणा, मर्यादित आणि तोकड्या रूपाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच मुख्य रस्त्यासोबत आवश्यक अशा पर्यायी रस्त्यांचा अभाव, यावरील उपाययोजनाही अनेक वर्षे प्रलंबित आहे.शहरातील गोपीनाथ मुंडे चौक ते निगडी चौक येथील वाढती वाहतूक पाहता या रस्त्याचे रुंदीकरण व निगडी मुख्य चौकांचे विस्तारीकरण करणे काळाची गरज आहे.येथे वाहतूक सिग्नल व वाहतूक पोलिस असूनही केवळ जागे अभावी अशी वाहतूक कोंडी नित्याचीच असते. डाव्या बाजूकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा रस्ता तर पूर्णपणे व्यापलेला असतो. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत वाट पाहावी लागते.परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
निगडी चौकापासून मागे बजाज ऑटो कंपनीच्या भिंतीलगत जवळपास २०० ते ३०० मीटर मागे गाड्यांच्या रांगा लागतात. कारण डावीकडे जाणार्या वाहनांसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे ते जाऊ शकत नाहीत. बजाज ऑटो कंपनीच्या भीतीची आतील जागा जरी मिळाली तरी येथील लागणाऱ्या रांगा कमी होतील व निगडी चौक वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेईल. त्यामुळे महानगरपालिका अधिनियम २०५ अंतर्गत बजाज ऑटो कंपनीच्या भिंतीची जागा घेऊन आपण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला तर निगडी सिग्नल हा मोकळा श्वास घेईल अशी माहिती केंदळे यांनी दिली.