शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ डिसेंबर) :- भोसरी सहल केंद्र येथे फिश अॅक्वारियम करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या विषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे २७ कोटी २३ लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
महापालिका कार्यक्षेत्रातील विकसक, बांधकाम व्यावसायिक तसेच खाजगी मिळकतधारक यांची पाणीपुरवठा विषयक तसेच जलनि:सारण विषयक कामे परवानाधारक प्लंबर्स यांच्यामार्फत करण्यात येतात. त्याकरीता खाजगी प्लंबर्सना महापालिकेमार्फत परवाना देण्यात येतो. त्यासाठी परवाना धारकांना पाच वर्षाकरीता दीड हजार रुपये परवाना फी आकारण्यात येते. ही परवाना फी सन २००१ या आर्थिक वर्षापासून प्रचलित आहे. २० वर्षाहून फी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नसल्याने नवीन प्लंबर परवाना देण्यासंदर्भात ३ वर्षांकरीता पाच हजार रुपये फी तसेच नुतनीकरण करण्याकामी प्रतिवर्षी १ हजार रुपये फी दरवाढ करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
केंद्रशासनाकडील अमृत योजने अंतर्गत शहराच्या ६० टक्के भागामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम चार निविदा पॅकेजमध्ये चालू असून या प्रकल्पांतर्गत नेटवर्क सुधारणा करुन जलवाहिनीचा दाब वाढविणे, पाण्याची उंच टाकी बांधणे, नवीन नळजोडणी करणे आणि पाणीगळती कमी करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत. या प्रकल्पामध्ये विविध कारणांमुळे अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा वाढीव खर्च झालेला आहे. यामध्ये भौगोलिक परिस्थितीत बदल, जलवाहिनीतील गळती, पाणीपुवठ्याबाबत वारंवार होणा-या तक्रारी, विकासकामांवेळी खोदाई करताना वाहिन्यांची होणारी तुट फुट, कामांचे वाढलेले दर अशा कारणांचा समावेश आहे. त्यामुळे या खर्चात निर्धारीत रकमेपेक्षा सुमारे ११ कोटी ५३ लाख रुपये अधिक खर्च होणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी १ कोटी २९ लाख रुपये, प्रभाग क्र. १२ तळवडे येथील बाठेवस्ती परिसरातील जुने अस्तीत्वातील रस्त्याचे खडीमुरुमीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, प्रभाग क्र. १२ रुपीनगर परिसरातील सेवा वाहिन्यांकरीता खोदलेले चर खडीमुरुमाने भरण्याकामी ३१ लाख रुपये, प्रभाग क्र. १९ मधील आंबेडकरनगर, भिमनगर, सँनिटरी चाळ आणि इतर झोपडपट्टीतील स्थापत्य विषयक कामाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी १७ लाख रुपये, प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर मधील शिवराजनगर आणि परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी २२ लाख ८१ हजार तर मनमंदीर सोसायटी परिसर आणि इतर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी २२ लाख ८२ हजार रुपये खर्च होणार आहेत.
तसेच प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव परिसरातील रस्त्यांवरील ट्रेंचेस आणि खड्ड्यांची हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स पध्दतीने दुरुस्तीची कामे करण्यासाठी १९ लाख ७६ हजार रुपये तर विविध अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख ६६ हजार रुपये खर्च केले जाणार असून या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.