शबनम न्यूज : आळंदी (दि.०३ जानेवारी) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव,(आळंदी), येथे पुणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रा.सोनाली अभंग, प्रा. शैला तापकीर कु. पूजा बवले, कु. यश भोरे व कु. रुपेश बरणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
व्याख्यानाच्या व्याख्यात्या मा.ॲडव्होकेट क्रांती कराळे गारगोटे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करून देत. सावित्रीबाईंनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी यातून स्त्रियांची शिक्षणाच्या माध्यमातून कशी सुटका केली. याबाबत सविस्तर विवेचन करीत आजची स्त्री हुंडाबळी, भ्रूण हत्या, बलात्कार व ऍसिड हल्ले यापासून कशी सुरक्षित राहू शकते याबाबत मत व्यक्त करीत आज क्रांतीज्योती सावित्री व राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार व शिकवणुकीची स्त्रिजीवनात कशी आवश्यकता आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आज स्त्रियांनी सावित्रीबाईच्या विचाराचा वसा आणि वारसा चालविण्याची गरज व्यक्त करीत ज्या ठिकाणी नारीची पूजा होते तेथे देवाचा वास असतो, म्हणून नारीदेवतेचा सन्मान केला पाहिजे असे मत व्यक्त करीत केवळ थोरांचे नावे न घेता त्यांच्या कार्याचा आदर्श जपला पाहिजे असे विवेचन करीत आज सावित्रीबाईच्या कार्यामुळे देशात व परदेशात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात तत्परतेने कार्य करीत आहेत याबाबत अनेक उदाहरणे देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर महिला सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,डॉ. रणजीत कदम, प्रा. संजीव कांबळे व प्रा.प्रेरणा पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मा. मयूर मुरलीधर ढमाले – खजिनदार गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.करिष्मा सातपुते यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रेरणा पाटील यांनी करून दिला तर आभार प्रा. दिपाली सोनवणे यांनी मानले.
या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणिमा. डॉ. दादासाहेब गारगोटे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे, प्रमुख,प्रसिद्धी विभाग, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.