शबनम न्यूज : पुणे (दि.२९ जानेवारी) :- पुण्यातल्या शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार आज पुण्यात होते.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ,महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी, आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे आणि अधिकारी उपस्थित होते.
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मुंबईत रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे. १० व १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत शिक्षणमंत्री निर्णय घेतील. पुणे जिल्ह्यात लसीकरण १ कोटी ६१ लाख झाले आहे. शाळांत लसीकरण मोठ्या प्रमाणात करणार आहे. ५ मेट्रिक टन ऑक्सिजन फक्त आता लागत आहे. नियम पाळून पर्यटन ५० टक्के सुरू राहील, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 86 टक्के 15ते 18 वयोगटातील व्हॅक्सीन झालं. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झाल्याचे समोर आले आहे.
आठवडाभर हाफ डे
पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
शाळा-महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून !
कोरोना रुग्णसंख्येतील घट लक्षात घेत पुणे मनपा हद्दीतील शाळा-महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री आढावा बैठकीत घेण्यात आला असून इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा अर्धवेळ आणि पुढील वर्ग पूर्णवेळ सुरु असणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 29, 2022
Advertisement
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2022
Advertisement