शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोरे वस्ती परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नवीन विद्युत डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे नेताजी दादाराव काशीद यांनी कार्यकारी अभियंता महावितरण, भोसरी विभाग यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, चिखली मोरे वस्ती परिसरात गेल्या वर्षभरापासून अधून मधून विजय संदर्भातील विविध समस्या निर्माण होत आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात एप्रिल २०२१ मध्ये महावितरणच्या थरमॅक्स कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले होते. त्यावेळी आश्वासन देऊनही समस्यांची सोडवणूक करण्याकडे महावितरणकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मोरेवस्ती भागातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
मोरेवस्ती भागातील राजगड पार्क, श्रीराम सोसायटी, माऊली सोसायटी या परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होते. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे नुकसान होते. या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी येथे दर्जेदार विद्युत केबल आणि जादा
क्षमतेची विद्युत ट्रांसफार्मर डीपी बसविण्याची गरज आहे. यासाठी तातडीने कार्यवाही करून नागरिकांना विजेचे समस्यांमधून दिलासा द्यावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असेही सदर निवेदनात नेताजी काशीद यांनी नमूद केले आहे.