पुण्यातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण
शबनम न्यूज : पुणे (दि.०९ फेब्रुवारी) :- पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला.
येत्या १५ दिवसांत उड्डाणपूल पूर्णत्वास जात असून २३ फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे येऊ शकणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी खुला होऊन कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे’, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, ‘स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना मांडली होती.
ते म्हणाले की, नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला.
आता हा प्रकल्प सिद्धीस जात असल्याचे मनस्वी समाधान आहे. मेट्रोकडून पुणे महापालिकेच्या ताब्यात हा उड्डाणपूल आल्यावर कोणत्याही विलंबाशिवाय वाहतुकीसाठी खुला केला जात आहे.
नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असल्याने याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे.
कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मोहोळ यांनी आभार व्यक्त केले आहे.
कर्वेरस्ता लवकरच घेणार मोकळा श्वास !
पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा आज मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला. pic.twitter.com/5ZGxKAM3JY
Advertisement— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 8, 2022