मेट्रो सिटी वृत्तांत | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली देत तहकूब करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने तहकूब झालेली सभा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार १३ मार्च रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या अगोदर ही महासभा होणे आवश्यक आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा कार्यक्रम पत्रिका क्रमांक ६७ दि. १८ /०२ /२०२२ ची सभा दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून दि. १७/०३/२०२२ पर्यंत तहकूब केलेली आहे. परंतू आपल्या महापालिकेच्या सदस्यांची मुदत कार्यकाल हा दि. १३ /०३ /२०२२ रोजी संपुष्टात येत असलेने महापालिका विसर्जित होणार आहे. त्यामुळे दि. १७/०३ /२०२२ रोजी महासभा होऊ शकणार नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आम्ही स्थायी समितीचे चार सदस्य विशेष महासभेचे आयोजन करण्याची मागणी करत आहोत.
दि.१८/०२/२०२२ रोजी तहकूब करण्यात आलेली महासभा ही सध्याच्या नगरसेवकांची शेवटची सभा ठरणारी असतानाही ही सभा घेण्यात आलेली नाही. तसेच तहकूब दिनांकाची सभा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने होणार नसल्याचे विशेष महासभा घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांतील विकास कामांसह इतर अनेक मुद्यांवर या सभेमध्ये चर्चा करणे अपेक्षित आहे. सध्या अनेक मुद्दे शहर पातळीवर चर्चेत असल्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. या मुद्यांवर चर्चा घडून आल्यास नागरिकांमध्ये असलेलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. विशेष करुन भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा व्हावी. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शहरातील विकासकामांबाबतचे मुद्दे तसेच भय, भष्टाचार आणि विकास या मुद्यांवर देखील सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने आपण आठवडाभरात महासभेचे आयोजन करावे. असे हि सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.
या प्रंसगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक, मयुर कलाटे राजु बनसोडे, प्रविण भालेकर, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे , सुलक्षणा राजू धर उपस्थित होते.