शबनम न्यूज : पुणे (दि.२६ फेब्रुवारी) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ३२ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे ९ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
जाहीर ई-लिलावात एकुण ३२ वाहने आहेत. यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.
जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ०२. मार्च ते ६ मार्च या कालावधीत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.
ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर २ मार्च ते ७ मार्च या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रकमेचा ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड’ या नावे अनामत रक्कमेच्या धनाकर्षासह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी, मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम २५ फेब्रुवारीपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सुचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६. वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.