शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- “कठोरता आणि मृदुता यांचा संगम म्हणजे बाप होय! ‘बाप’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात सुमारे शहात्तर बापांचे अनुभवविश्व अन् मायेचे छत्र कवींनी शब्दबद्ध केले आहे!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे शुक्रवार, दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी व्यक्त केले. कवयित्री वंदना इन्नाणी संपादित ‘बाप’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे तसेच कै. शिवदास भुतडा संकलित अन् वंदना इन्नाणी संपादित ‘शिवामृत’ या आयुर्वेदिक माहितीपर पुस्तकांचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगरसेविका सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, चित्रपटनिर्माते संदीप राक्षे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, माजी सहाय्यक प्रशासनअधिकारी शारदा लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, योगेश लोंढे, विराज लांडे, अजय लढ्ढा, मनोज मराठे, ज्येष्ठ साहित्यिक हरिदास कोष्टी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती मथुरा भुतडा, डॉ. अंजना भंडारी, रुद्र नाणेकर, दिव्या वर्पे यांना अनुक्रमे सामाजिक योगदान, पीएच.डी. संपादन, वैद्यकीय शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्ती, क्रीडानैपुण्य याबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नाना शिवले यांनी आपल्या मनोगतातून, “बाप लेकीचे नाते खूप घट्ट असते, या पुस्तकांच्या माध्यमातून हे नाते पुन्हा एकदा वृद्धिंगत झाले आहे!” असे तर प्रा. दिगंबर ढोकले यांनी, “मृद्गंध, बाळाच्या टाळूचा गंध अन् नवीन पुस्तकाचा सुगंध हे आनंददायी असतात!” अशी मते व्यक्त केलीत. सचिन लांडगे, बबनराव झिंजुर्डे यांनी शुभेच्छा दिल्या. वंदना इन्नाणी यांनी आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून, “समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे, या पार्श्वभूमीवर ‘बाप’ हा कवितासंग्रह संपादित करावासा वाटला; तसेच माझ्या वडिलांनी आयुर्वेदिक माहितीचा खूप मोठा संग्रह केला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तो माहितीचा खजिना ‘शिवामृत’ या नावाने समाजासाठी उपलब्ध करून दिला आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.
प्रकाशन सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या आणि ‘बाप’ या प्रातिनिधिक संग्रहात सहभागी झालेल्या सुमारे शहात्तर कवींना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि पुस्तकं प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्रीकांत चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “बाप या एका चिरंतन नात्याविषयी हृद्य कृतज्ञता या कवितासंग्रहातून व्यक्त झाली आहे; तर ‘शिवामृत’ हे आयुर्वेदिक माहितीचे पुस्तक म्हणजे समाजकारणाचे विधायक रूप आहे!” असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनात सुरेश इन्नाणी, राज अहेरराव, दिलीप सुतार, वसंत भुतडा, सचिन भुतडा, जगदीश भुतडा यांनी परिश्रम घेतले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना इन्नाणी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.