शबनम न्यूज : पुणे (दि.०६ मार्च) :- भारतीय शास्त्रीय नृत्याचा गेली २६ वर्षे प्रसार करणाऱ्या नृत्यगुरु तेजश्री अडीगे यांना ‘टाईम्स अपलॉड’ संस्थे तर्फे दिला जाणारा ‘ट्रेंडसेटर २०२२’ हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समारंभ पूर्वक देण्यात आला. याप्रसंगी प्रख्यात पार्श्वगायक पद्मश्री कुमार सानू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निगडी येथील नृत्यकला मंदिर या त्यांच्या संस्थेमार्फत हजारो कलावंतांना भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. मुंबईच्या नृत्यगुरू अर्चना पालेकर (लोककला) आणि पुण्याच्या नृत्यगुरू सुचेता चाफेकर (भरतनाट्यम्) यांच्याकडून त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. संसद भवन, राजभवन येथील विशेष सांस्कृतिक कार्यकमात यांचा नृत्याविष्कार सादर झाला असून पुणे फेस्टिव्हल, अखिल भारतीय नाट्य संमेलन आणि स्वरसागर संगीत महोत्सव अशा देशातील अनेक सांस्कृतिक महोत्सवात त्यांनी भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादर केले आहेत.