शबनम न्युज | पुणे
पुणे मनपाच्या प्रयत्नातून आणि भारत सरकारच्या पुढाकाराने पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या विकास आणि सुशोभीकरण करण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकार जाणीवपूर्वक आडकाठी करायचा प्रयत्न करत आहे असे मत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. मागील आठवड्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र सरकार आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प होत आहे. परंतु दोन्हीकडे भाजपचे प्रशासन असल्याने हा प्रकल्प झाल्यास महा विकास आघाडी सरकारला त्याचा काही फायदा होणार नाही असे दिसल्याने राज्य सरकारने एक समिती नेमून हा प्रकल्प कसा पुढे ढकलता येईल यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. पुणे शहराच्या चौफेर पुणे मनपाकडून प्रस्तावित केलेल्या आणि विक्रमी वेळात पूर्ण होणाऱ्या विकास कामांचा धसका घेऊन राज्य सरकार पुणेकरांच्या सोयीचे प्रकल्प कसे लांबवता येतील याचाच प्रयत्न करताना दिसत आहे. विक्रमी वेळात पूर्ण होणारा मेट्रो प्रकल्प, चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल तसेच पुणे शहरातील पूर्णत्वास येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे श्रेय हे फक्त मनपातील भाजपा प्रशासनाला मिळेल हे लक्षात आल्याने राज्य सरकार या विकास कामांच्या विरोधात काम करत आहे असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पुणे शहरातील प्रस्तावित रिंग रोड, पी एम आर डी ए चे योग्य नियोजन, पुरंदर येथील विमानतळ अशा राज्य सरकारच्या अखत्यारीतील अनेक प्रकल्पांमध्ये येत असलेले अपयश आणि त्या उलट मनपाच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी भाजप घेत असलेले परिश्रम या मधील तफावत सर्वसामान्य जनतेला दिसू लागल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. दिशाहीन ठाकरे सरकारने पुणे शहराच्या विकासाला आडकाठी घालायचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा इशारा श्री जगदीश मुळीक यांनी दिला. पुणेकर जनता अत्यंत सुजाण असून ठाकरे सरकारच्या पुण्याच्या विकासाला खीळ घालण्याच्या प्रयत्नांना येणाऱ्या निवडणुकीत चोख प्रत्युत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.