शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ मार्च ) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ‘नगरसेवक’ नामफलक तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन ,एम आय एम पक्ष शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा . प्रशासक तथा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवक यांचा कार्यकाळ दिनांक 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला.त्यांनतर प्रशासक यांच्या मार्फत महानगरपालिकेचे कामकाज सुरू झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी तसेच महानगरपालिकेत मा.महापौर/उपमहापौर,मा.नगरसेवक.स्थायी समिती अध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध समिती सदस्य ज्यांचा कार्यकाळ संपला आहे असे सर्व सदस्य यांचे नामफलक व संपर्क कार्यालय,निवासस्थान असलेले दिशादर्शक फलक काढुन टाकणे गरजेचे आहे.
महापौर/उपमहापौर नगरसेवक व महापालिका अंतर्गत असलेले विविध समिती सदस्य यांचा कार्यकाळ संपून अनेक कालावधी उलटून जातो.परंतु या सन्माननिय व्यक्तींच्या नावाने असणारे नामफलक,दिशादर्शक फलक हे वर्षानुवर्षे तसेच राहतात त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर वाढतेच आहे परंतु सामान्य नागरिकांत संभ्रम निर्माण होतो.
त्यामुळे शहरातील नामफलक, दिशादर्शक फलक,व अनाधिकृतरित्या बसवलेले फलक हे देखील आपण तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावे, असे ही सदर निवेदनात धम्मराज साळवे यांनी नमूद केले आहे.