शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना युवा सेना शहर प्रमुख भोसरी अजिंक्य उबाळे यांनी सेक्टर 21 मध्ये मीनाताई ठाकरे जलतरण तलाव लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे याबाबत पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, यमुना नगर मध्ये मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेली दोन वर्षांपासून कोव्हिडच्या कारणाने बंद होता व आता सध्या नादुरुस्त असल्याने बंद आहे नागरिकांची गरज व सुविधा म्हणून लवकरात लवकर जलतरण तलाव सुरू करण्यात यावा या मध्ये महिलांसाठी व लहान मुलांसाठीची वेळ राखून ठेवावी व त्यांच्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध करावेत जेणेकरून नागरिकांना याचा परिपूर्ण उपयोग करून घेता येईल.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाच्यावतीने जलतरण तलाव बंद करण्यात आले होते.
सध्या कोरोनाचे सावट ओसरल्याने दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे प्रशासनाने जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, अशी मागणी जलतरणपटू करीत आहेत.
पालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत भोसरी परिसरातील चालविण्यात येणारे जलतरण तलाव बंद आहेत. क्रीडा विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी तेरा जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, हे जलतरण तलाव अद्यापही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तेरा तलावांपैकी सध्याचा स्थिततीला पिंपळे गुरव येथील तलाव सुरू आहे. इतर तलावांची देखभाल दुरुस्तीची कामे आहेत. सुमारे दोन वर्षांपासून तलाव बंद असल्याने तलावातील फरशा निखळल्या आहेत.अनेक ठिकाणी विद्युतविषयक कामे, मोटार दुरुस्ती, फिल्ट्रेशन प्लँट दुरुस्ती कामे सुरू असल्याची माहिती क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात आली.
अनेक जलतरणपटू नियमित सरावासाठी येतात. पासधारक, ज्येष्ठ नागरिक, बच्चे कंपनी, खेळाडू नियमितपणे तलावावर पोहोण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात. परंतु, जलतरण तलाव बंद असल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे.