राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लबचा उपक्रम
शबनम न्यूज : पुणे (दि.१६ एप्रिल) :- कोरोना साथीच्या काळानंतर, समाजाच्या उन्नतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाला गती मिळण्यासाठी ‘कपॅसिटी बिल्डिंग ‘ विषयावर आयोजित ‘एनजीओ मीट २०२२’ या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने १६ एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी दीड या वेळेत हॉटेल क्लर्क इन, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे ही कार्यशाळा पार पडली.
खा . अॅड वंदना चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्या नात्याने ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेलचे अध्यक्ष अनिल मंद्रुपकर (कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि क्षमता वाढीची गरज), दिलीप देशमुख–माजी धर्मादाय आयुक्त,पुणे (धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाज), सीए सुरेश मेहता(एनजीओसाठी प्रभावी प्रशासन आणि कायदेशीर पैलू), सीए राम डावरे(एनजीओसाठी ८०-जी,१२ ए,आय आय सी ए नोंदणी),डॉ अनिल धनेश्वर(सीएसआर निधी मार्गदर्शक तत्त्वे) या तज्ज्ञानी मार्गदर्शन केले .स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि त्यांच्या समस्यांबद्दल या परिषदेत चर्चा झाली.
संयोजन समितीच्या वतीने अनिल मंद्रुपकर, प्रमोद उमरदंड, किशोर मोहोळकर, विश्वास सूर्यवंशी, जयश्री पाथरकर, सौरभ सूर्यवंशी स्वागत केले.
महाराष्ट्रातील ५० स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. योगेश कदम, मयूर बागूल यांनी सूत्रसंचालन केले.
खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ सामाजिक काम करताना सर्व नोंदी ठेवणे अवघड वाटले तरी पारदर्शक कारभारासाठी आवश्यक आहे. अशा कार्यशाळा होत राहिल्या तर स्वयंसेवी संस्था अधिक प्रभावी काम करू शकतील, अधिक उत्तरदायी ठरतील. जागतिक तापमानवाढीपासून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासारखी अनेक कामे स्वयंसेवी संस्थाना करता येण्यासारखी आहेत. सक्षम होऊन संस्थांनी सर्व क्षेत्रातील आव्हाने पेलावीत.
महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्ट प्रत्येक स्वयंसेवी संस्था चालकांनी वाचला पाहिजे, असे सांगून दिलीप देशमुख यांनी कायद्याचे सविस्तर विवेचन केले. विश्वस्तपदाची जबाबदारी फायद्यासाठी नसून सेवेसाठी असते, त्यानुसार गांभीर्यपूर्वक कामकाज करावे, असेही त्यांनी सांगीतले.
सुरेश मेहता म्हणाले, ‘ स्वयंसेवी संस्था नोंदणी करताना इतर संस्थेची घटना जशीच्या तशी कॉपी करू नये. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देताना भान ठेवावे. बेकायदेशीर व्यवहार करू नये. न्याय, नीती, कायद्याची चौकट असली पाहिजे.
अनिल धनेश्वर म्हणाले, ‘ स्वयंसेवी संस्था या समाजात सकारात्मक बदल करणारे देवदूत आहेत. सीएसआर निधीतून या संस्था सक्षम होत राहिल्या पाहिजेत. कंपन्यांना सीएसआर फंड साठी प्रस्ताव देताना तो खरोखर योग्य समस्येवर उत्तर म्हणून तयार केलेला असावा.
राम डावरे म्हणाले, ‘ सीएस आर फंड मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक एजंट फसवतात.स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या नादी लागू नये. १२- अ, ८० जी, सीएसआर -१ ही प्रमाणपत्रे मिळवून ठेवावी. प्रमाणपत्रे मिळाल्यावर सतत पूर्तता करीत राहावे.