शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे सचिव उमेश बांदल आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती येथील यावल या गावी झाला. त्यांनी अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मुलनासाठी भजन आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाजप्रबोधनाचे कार्य केले. तुकडोजी महाराजांची “या झोपडीत माझ्या” ही कविता अतिशय लोकप्रिय आहे. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अशा आशयाची कविता हृद्यस्पर्शी आहे. त्यांच्या “रामगीता” या काव्य संग्राहातून त्यांनी आत्म संयमनाचे विचार मांडलेले आहेत. त्यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र साजरी केली जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.