शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात शबनम न्यूज या वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शबनम न्यूजच्या संपादिका शबनम सय्यद यांची मराठी पत्रकार परिषद संलग्न, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरची निवड मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली असून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अरुण उर्फ नाना कांबळे व मुख्य सल्लागार बाळासाहेब ढसाळ यांनी पिंपरी चिंचवड शहरात महिला पत्रकारांसाठी एक वेगळे नेतृत्व तयार व्हावे, याकरिता प्रयत्न केले व त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. यानंतर त्यांनी शबनम सय्यद यांची पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षपदी निवड केली.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संघाची नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेच्या आदेशावरून पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया जनार्दन दांडगे, पिं. चिं. पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात शबनम सय्यद यांनी शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून अविरतपणे वृत्तसेवा दिली आहे. नजीकच्या काळात त्यांनी दैनिक मेट्रो सिटी वृत्तांत सुरू करून आपल्या या वृत्तसेवेला विकसित केले आहे. शहरातील , जिल्ह्यातील तसेच राज्यातील,विविध घटना या सर्वसामान्य वाचकांपर्यंत बातमी स्वरूपात पोहोचविण्याचे प्रामाणिक काम शबनम सय्यद यांनी केले. आपल्या शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून दैनिक वृत्तपत्र मेट्रो सिटी वृत्तांत, साप्ताहिक वृत्तपत्र शबनम न्युज, शबनम न्युजचे गुगल प्लेस्टोर ऍप, शबनम न्युज युट्युब चॅनल या माध्यमाद्वारे त्यांची वृत्तसंस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. व संपूर्ण पुणे व पिंपरी चिंचवड शहरात शबनम सय्यद यांची महिला पत्रकार म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली. त्यांची प्रामाणिक काम करण्याची पद्धत, संयमी स्वभाव व नेतृत्व गुण हे नक्कीच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना फायदेशीर ठरेल. शबनम सय्यद यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.