शबनम न्युज | मुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती.राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे या भेटीकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते.
राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो. मागे राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे गणपती दर्शन आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली असं त्यांनी सांगितले.तसेच या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही भेट घडली. या भेटीत आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यात काम केले आहे. राजसाहेबांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात राज्यभर काम केले आहे त्यामुळे या भेटीत बऱ्याच जुन्या आठवणी चर्चेत आल्या असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.