मा. उपमहापौर शैलजाताई मोरे यांचे प्रतिपादन
शबनम न्युज | पिंपरी
आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. दुर्गामातेची भक्ती करून मिळालेल्या शक्तीच्या जोरावर ती कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात करियर घडवत आहे. तीची धडपड कुटुंबाबरोबरच सामाजाला दिशा देण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे अशा नवदुर्गांचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर सौ. शैलजाताई मोरे यांनी केले.
माजी उपमहापौर सौ. शैलजाताई मोरे यांच्या संकल्पनेतून भारतीय स्त्रीशक्ती जागरण शाखेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणा-या 11 नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. तसेच, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम पार पडले. क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रीत केले, हे सर्वांना समजण्यासाठी यशस्वी दुर्गांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील त्यांच्या यशाचे गमक समजून घेता आले. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये विविध खेळ प्रकारात नैपुण्य मिळवणा-या मुलींचा देखील सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेने दत्तक घेतलेली पाड्यावरील मुलीचा समावेश होता.
आकांक्षा धानवडे (स्केटींग), प्रगती गायकवाड (कुस्ती), वैष्णवी कुलकर्णी (रोलबॉल), श्वेता कदम (थलेटिक्स व रोलबॉल), रिया भोसले (लॉन टेनिस), हर्षिता काकडे (जिमनॅस्टिक), आयुषी वारंग (जिमनॅस्टिक), प्रियंका सोनवणे (कबड्डी – ज्ञानप्रबोधिनी दत्तक खेळाडू), धनश्री तेगे (कबड्डी), आर्या हराळ (कराटे) आणि श्रेया कदम (कराटे) या नवदुर्गांचा यथोचित सन्मान करण्यात आला. भारतीय स्त्रीशक्तीच्या निवेदिता कच्छवा, अनघा शेवळे, स्मिता मोडक व संपदा पटवर्धन, माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.