शबनम न्युज | पिंपरी
पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना दि. २९ ऑग. २०२२ रोजी बोरजाई माता मंदिराजवळ, बोरजाई नगर, खेड, ता. पुणे येथे घडली. आशा गोरक्ष देशमुख (वय ३०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ६ ऑक्टो. २०२२ रोजी चाकण पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गोरक्ष बबन देशमुख (वय ३५, रा. बोरजाई माता मंदिराजवळ, बोरजाई नगर, मेदनकरवाडी), रोशन भगत (वय २२. रा.मेदनकरवाडी) तसेच रोशन याचा मित्र देवा व मुंडे (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही), बबन शिवलिंग देशमुख (वय ६२, रा.पेडगाव, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा देशमुख हिचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून गोरक्ष देशमुख याने रोशन व देवा, मुंडे यांच्यासोबत मिळून कट रचून आशा हीचा दोरीने गळा आवरून खून केला. व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत आळंदी घाटात फॉरेस्ट जागेत पुरवले. त्यांनतर १ ऑक्टो. रोजी सदर प्रेत गोरक्ष देशमुख याने बबन देशमुख यांच्या मदतीने खड्ड्यातून बाहेर काढून जाळले. परंतु त्यावेळेस पाऊस येत असल्याने सदर प्रेत अर्धवट जळाल्याने ते फॉरेस्ट जवळ असलेल्या तळ्यामध्ये फेकले. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, अधिक तपास चाकण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.