शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
निगडी, देहूरोड व वाकड पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर लॉटरी, जुगार, व्हिडिओ पार्लर व वेश्याव्यवसाय करणाऱ्या विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
यामध्ये निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील, पवळे ब्रिज जवळील बस स्टॉप मागे असणाऱ्या जयप्रकाश मार्केट मधील सचिन शंकर रोमन, विजय शंकर रोमन दोघेही (रा. साईनाथ नगर, निगडी) तसेच रितेश अशोक केशवानी (रा. यमुना नगर निगडी), आनंद प्रसाद (रा.मोरे वस्ती चिखली), केतन उर्फ बंटी बदाम मुसळे (रा. वाल्हेकरवाडी) या लॉटरी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ भा.द.वि. कलम ४२० व द गेमिंग अँड लॉट्रीज (अमेंडमेंट) अॅक्ट २०१९ चे कलम ४ अन्वये एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच यामध्ये ६,०७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ व्हिडिओ गेम मशीन, ७ एलईडी टीव्ही, रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर दुकानाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई व्हिडिओ गेम पार्लर या ठिकाणी छापा टाकून साई व्हिडिओ गेम पार्लर चालक समीर शेख (रा. देहूगाव) व गणेश खंडेलवाल व इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जय मातादी व्हिडिओ गेम पार्लर चालक हरीश विठ्ठल तटकरे (रा. किवळे) यांच्याविरुद्ध कारवाई करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत देहूरोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ भा.द.वि. कलम ४२० व द गेमिंग अँड लॉट्रीज (अमेंडमेंट) अॅक्ट २०१९ चे कलम ४ अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १३ व्हिडिओ गेम मशीन, रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच वाकड पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची मुक्तता करण्यात आली.
सदर कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, सपोआ (गुन्हे) प्रशांत अमृतकर व गुन्हे शाखेकडील ७ पोलीस निरीक्षक,५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस हवालदार यांच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली.