शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात टेबलटेनिस स्पर्धेमध्ये वाकड येथील अक्षरा इंटरनॅशनल स्कूल ने अव्वल क्रमांक मिळवत यश संपादन केले. इंदिरा इंटरनॅशनल स्कूल ताथवडे आणि एस.बी पाटील पब्लिक स्कुल रावेत यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा स्थान मिळवला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी १७ वर्षाखालील मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या.
अक्षरा स्कूलच्या रक्षित कक्कर आणि इंदिरा स्कूलच्या देवांश राणे याच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात रक्षित कक्करने २ – १ असा निसटता विजय मिळवला. देवांश राणे या खेळाडूने या सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिली. तसेच अक्षरा स्कूलच्या सोहम पटेल या खेळाडूने इंदिरा स्कूलच्या शिवराज साळवे या खेळाडूवर ११-३, ११-४ असे सलग दोन सेट जिंकत मात केली. पहिल्या सामन्यात विजयी ठरलेल्या सोहम पटेलला पुढील सामन्यात इंदिरा स्कूलच्या ऋतुराज अभ्यंकर याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. ऋतुराजने सोहमचा २-० असा पराभव केला. त्यानंतर अक्षरा स्कूलच्या आदित्य श्रीकृष्णा याने शिवराज साळवे यावर विजय नोंदवला. २-० असे यश त्याने या सामन्यात मिळवले. त्यानंतर ऋतुराज अभ्यंकर आणि आदित्य श्रीकृष्णा यांच्यात झालेल्या सामन्यात ऋतुराज अभ्यंकर विजयी ठरला. २ – ० अशा फरकाने त्याने सामना जिंकला.
अक्षरा इंटरनॅशनल स्कूल ने इंदिरा इंटरनॅशनल स्कूलवर ३-२ सामने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तर इंदिरा इंटरनॅशनल स्कूलला उपविजेते पद मिळाले. एस.बी पाटील पब्लिक स्कुल रावेत यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये सुमारे ३३ शाळांमधून १६५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.