मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
शबनम न्युज | मुंबई
शिवडी – वरळी उन्नत मार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओलांडणी पूल (आरओबी) बांधकामबाधित ‘जी’ आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘या प्रकल्प बाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरित्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे. व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, अशा रीतीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहातील या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, माजी आमदार किरण पावसकर आदी उपस्थित होते.