शबनम न्युज | सातारा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तराहून निषेध व्यक्त केले जात आहे. तर भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करत उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले आहे. आता ‘रायगडावर जाऊन छत्रपतींच्या समाधी समोर आत्मक्लेश करणार’ असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे .
ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. शिवाजी महाराजांचा, महापुरुषांचा अवमान होत असून, ही बाब गंभीर आहे. त्यासाठी आम्ही रायगडावर निघालो असून, तेथे छत्रपती समाधी जवळ जाऊन आम्ही वेदना मांडणार असून, आत्मक्लेश करणार आहोत.
“निर्धार शिवसन्मानाचा” या माध्यमातून रायगडावर जाऊन उद्या शनिवारी छत्रपतींच्या समाधी समोर उदयनराजे आत्मक्लेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज रायगड कडे कुच केली आहे. जलमंदिर पॅलेस या निवासस्थानातून निघाल्यावर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले कि, कोणत्या व्यक्तीविरोधात आमचे हे पाऊल नाही. पण शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. या विरोधात कोणीतरी बोलले पाहिजे, मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. ज्या घराण्याचे नाव लावताना मी आवाज उठवला नाही. आम्ही नैतिक दृष्ट्या राहू शकत नाही. माझ्या ‘उदयन’ या नावापुढे राजे लावतो. ज्यांच्यामुळे हे पद, सन्मान मिळाला ते नाव लावायचा मला अधिकार नाही. केवळ त्यांचाच अवमान नाही, तर जे महापुरुष ज्यांनी स्वत: आयुष्य वेचलंय. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज विविध चळवळी, संघटना वाटचाल करत आहेत. त्यांनी योगदान दिले. त्यांची सुद्धा आज घुसमट होत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.