शबनम न्युज | नागपूर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदे मातरम्’ ने सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अभिजीत वंजारी यांची नियुक्ती केली.
मुंबई उपनगर अंधेरी पूर्व येथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला करून दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व भागातून त्या निवडून आल्या आहेत.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभेतील मान्यवर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विधानपरिषद सदस्य सुरेश विठ्ठलराव पाटील, प्रभाकर अनंत संत, शांताराम पुंजाजी आहेर यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. हा शोकप्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावत, सुभाष धोटे, सुनिल भुसारा यांचा यात समावेश आहे.