पुणे : छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे… ए वतन वतन मेरे आबाद रहे तू… मेरे माँ के बराबर कोई नहीं… किलबिल किलबिल पक्षी बोलती… आई मला छोटीशी बंदूक दे ना… लल्लाटी भंडार… आई भवानी… आई आंबे नाद झंकार तू… यासारख्या देशभक्ती गीत, भावगीत, बालगीतावर लहानग्यांनी ठेका धरला. नदी संपावर गेली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, गर्वाचे घर खाली, स्वच्छ भारत, दारूबंदी, झाडे वाचवा अशा विषयांवरील नाटुकली सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धेचे!. वंचित विकास संचालित अभिरुची वर्ग आणि फुलवातील बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने हा आनंदमेळा भरला. हुजूरपागा शाळेच्या सभागृहात झालेल्या या अभिनय स्पर्धेत संस्थेच्या वेगवेगळ्या वस्त्यामधील १२ अभिरुची वर्गातील मुलांनी तसेच लालबत्ती विभागातील फुलवा प्रकल्पामधील मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ४ ते १२ वयोगटातील २०० हुन अधिक मुलेमुली सहभागी झाली होती.
नाट्यछटा, नृत्य, समूहनृत्य, फॅन्सी ड्रेस, भारूड आदी प्रकारातील ३२ कलाविष्कार सादर केले. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपट गीते, भावगीते, भक्तीगीते देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला. नदी संपावर गेली, झाडे वाचवा, स्वच्छ भारत यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सासू सुनेचे भांडण यातून सामाजिक, तर दारूबंदी यातून व्यसनमुक्तीचा संदेश मुलांनी दिला. या नाट्यछटामधून लहानग्यांनी त्यांचे अभिनय कौशल्य दाखवले. फॅन्सी ड्रेसमध्ये कोणी झाड, कोणी बीट बनले, तर कोणी व्हाटसअप झाले. एका चिमुकल्याने ज्योतिबा फुले, तर एकाने पोलीस काका साकारले. यावेळी उपस्थित मुलांनी आणि पालकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
समर्थ नगर, चुनाभट्टी, सरगम चाळ, दत्त मंदिर, शिव मंदिर, भवानी पेठ, पवन नगर, दांडेकर पूल, जुनी देसाई वीटभट्टी, विश्वकर्मा, एकता मित्र मंडळ, अंबिकानगर या अभिरुची वर्गतातील, तसेच लोहियानगर किशोरी गट व फुलवा येथील बालकलाकारांनी सादरीकरण केले. वैदेही अष्टपुत्रे, सुप्रिया कुलकर्णी, रचना कापसे या स्पर्धेच्या परीक्षक होत्या.
मुलांना खाऊवाटप करण्यात आला. संस्थेच्या तुप्ती फाटक व स्नेहल मसालिया यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सुमनताई शिरवटकर या संस्थेच्या देणगीदार व स्नेही होत्या. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांनी दिलेल्या देणगीचा वापर मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जात आहे. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वंचित विकासचे विजयकुमार मर्लेचा, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.