शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुण्यातील महात्मा फुले मंडईजवळील गजबजलेल्या रामेश्वर चौकात दोन अज्ञातांनी एका व्यक्तीवर गोळीबार केली. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर अशोक शिंदे (वय 36, रा. मांजरी) असे पीडित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे मंडई भागातील रामेश्वर चौकातून जात असताना मोटारसायकलवरून आलेले दोघे संशयित त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने त्याच्यावर गोळीबार केला. तसेच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शिंदे यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. मागील काही वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी सांगितले की, शिंदेच्या भावाचे भूतकाळातील एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून नाव देण्यात आले होते आणि गोळीबार हा बदला घेण्यासाठी केलेला हल्ला असू शकतो असे संकेत दिले होते.