शबनम न्यूज | चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
मागील काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड करांवर शोककळा पसरली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील दमदार आमदार म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांची ख्याती होती.
दु. 3 ते 6 या वेळी पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी असेल.वसंध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपळे गुरव येथे होईल.
पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.
१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.भाजप चे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून लक्ष्मण जगताप ठरले त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आणली ही सत्ता स्थापन करताना लक्ष्मण जगताप यांनी मोठी भूमिका बजावली, अनेकांना नगरसेवक बनविले भारतीय जनता पक्षाने लक्ष्मण जगताप यांच्या जोरावरच पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेची सत्ता काबीज केली
गेल्या महिन्यातच भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यातच आज लक्ष्मण जगताप यांनी देखील आखेरचा श्वास घेतला.