शबनम न्युज | पुणे
पुण्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकानांमधून धान्य चोरून नेणाऱ्या आणि काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे 11 टन अन्नधान्य वाहून नेणारी तीन वाहने जप्त केली आहे. मुकेश माधव (वय.21), भाऊसाहेब कुटवे (वय.37), सादिक अलबेलकर (वय. 55), जावेद लालू शेख (रा. काशेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) एक पथक पुण्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकानांतून पळविलेल्या धान्याची अवैध वाहतूक आणि काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी पहाटे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कासुर्डी टोल प्लाझा येथे सापळा रचला. पहाटे चारच्या सुमारास पोलीस पथकाने तीन टेम्पो अडवून त्यांची झडती घेतली. तिन्ही वाहनांमध्ये गहू, तांदूळ आणि चणे 11 टन वजनाच्या बारीक पोत्या होत्या. अन्नधान्याच्या स्त्रोताविषयी विचारले असता, चालकांकडे कोणतेही स्पष्टीकरण नव्हते किंवा ते कोणतेही आवश्यक कागदपत्र सादर करू शकले नाहीत, असे एलसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.