शबनम न्युज | पिंपरी
आधुनिक युगात विविध स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक बळकटी यावी तसेच मुलांना त्यांचे शिक्षण आनंददायी वाटावे या दृष्टीकोनातून जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाची सुरुवात केली असून अशा माध्यमातून महापालिकेच्या शाळांचा दर्जा निश्चितपणे अधिक उंचावणार आहे, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. २४ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान आनंदोत्सव (कार्निव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे. आज चिंचवड येथील ऑटोक्लस्टर या ठिकाणी या उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ‘जल्लोष शिक्षणाचा’ या उपक्रमाबद्दल माहिती देताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उपआयुक्त संदिप खोत, विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, सहायक आयुक्त वामन नेमाणे, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, शीतल वाकडे, सुचिता पानसरे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे,रोहिणी शिंदे,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिका शाळांची गुणवत्ता अधिकाधिक वाढावी तसेच शाळांच्या सर्जनशील कल्पनांना आणि मुलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे यासाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून पुढील वर्षापासून या उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढविण्याचा महापालिकेचा मानस आहे. पुढील वर्षापासून शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळेला ‘स्कूल ऑफ द इअर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून राज्यातील इतर शाळांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. देशाचे भावी सुजाण नागरिक शाळांमध्येच घडतात. ‘जल्लोष शिक्षणाचा’ ही संकल्पना उत्कृष्ट असून शाळांमध्ये पोषक आणि आनंददायी वातावरण तयार केल्यावर विद्यार्थी शिक्षणाचा आनंद अधिक व्यापक प्रमाणात घेऊ शकतात हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केले आहे. शासकीय आणि खाजगी शाळांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमामुळे साध्य होत आहे. हा उपक्रम फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेपुरता मर्यादित न राहता राज्यातील इतर शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणाचा कायापालट या उपक्रमाच्या माध्यमातून शक्य आहे, असे मत राव यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने २४ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत कार्निव्हल आयोजन करण्यात आले असून यामध्ये आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, पुस्तकांचे स्टॉल, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, ट्रेझर हंट यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेले मॉडेल कार्निव्हलमध्ये ठेवण्यात आले होते. या स्टॉल्सला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.