शबनम न्युज | पुणे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे व प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. “राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची आणि पोलिस खात्याची जबाबदारी असते. लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होणार असतील तर यामध्ये गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे,” अशी मागणी अजित पवार यांनी केली. असे हल्ले कोणावरही होऊ नयेत. यामागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करावे. कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा समाजात संदेश द्यावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या जाहीरातबाजीवर अजित पवार यांनी निशाणा साधला. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे हे जाहीरातबाजी केल्याशिवाय सर्वसामान्यांना कसे कळणार? असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावला. कुठे खर्च करावा, कशाला प्राधान्य द्यावे हे कळायला हवे. दुर्लक्षित-वंचित वर्गाचे राहणीमान उंचावण्यासाठी सरकारने लोकाभिमुख कारभार करायचा असतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.