शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराला आता वेग आला आहे. या विधानसभा मतदारसंघातून वाकड मधील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा प्रचार सोमवारपासून सुरू होणार आहे. याआधी जावेद शेख यांनी पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची आज भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला आझमभाई पानसरे यांचे आशीर्वाद मिळाले, त्याचा विजय निश्चित असे मानले जाते.
त्यामुळे निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार हा आझमभाई पानसरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेत असतो. त्यास अनुसरूनच जावेद शेख यांनी आज आझमभाई पानसरे यांची भेट घेतली. त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मतदार संघात विजयासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
जावेद शेख हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तसेच या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रचार आवश्यक असून, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.