शबनम न्युज | पुणे
लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज जाधव (वय 20, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 2 जानेवारी 2023 ते 27 जानेवारी 2023 रोजी लांडगेचाळ कासारवाडी व मोरया कॉलनी चिंचवड पुणे येथे घडली. त्याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात पीडितेची आई यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी यांची सोशल मीडियाद्वारे मैत्री झाली. आरोपीने मैत्री करून फिर्यादी यांच्या पीडित मुलीचा विश्वास संपादन करून, तिला लग्नाचे आमिष दाखवून 2 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान, आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे मोरया कॉलनी येथे बोलावून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलगी ही दीड महिन्याची गर्भवती राहिल्याने सदर घटना समोर आली. यानंतर तिच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी पृथ्वीराज जाधव यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 363,373 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.