शबनम न्युज | पुणे
पुण्यातील ‘स्वरस्वप्न’ संस्थेतर्फे १३-१४ वर्षाची १० मुले-मुली व २० वर्षांची २ मुले यांचा व्हायोलिन वाद्यवृंद आज जर्मनीतील स्टुटगार्ट कडे रवाना झाला. व्हायोलिन वादक स्वप्ना दातार यांच्या ‘स्वरस्वप्न’ या संस्थेत ही सर्व मुले-मुली व्हायोलिनचे शिक्षण घेत असून जर्मनीतील स्टुटगार्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन व म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या निमंत्रणावरून तेथे जात आहेत. स्टुटगार्ट येथील संगीत विद्यालयाच्या श्रीमती स्टेफी ब्रॉयनिंग यांचा ‘दि टेलीमॅनर’ हा ऑर्केस्ट्रा वाद्यवृंद ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदासमवेत आपली कला सादर करेल.
‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदात १२ व्हायोलिन वादक मुले-मुली, २ तबला वादक, १ पखवाज वादक, १ साईड रिदम, २ ड्रम वादक यांचा समावेश आहे. स्वप्ना दातार तेथे सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन करणार आहेत. दि. २९ एप्रिल रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट आणि दि. १ मे या महाराष्ट्र दिनी जर्मनीतील म्युनिक येथे हा वाद्यवृंद आपली कला सादर करेल. या दोन्ही ठिकाणी भव्य अॅम्फीथिएटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा 2 तासांचा हा कार्यक्रम दोन भागात होणार असून पहिल्या भागात शास्त्रीय व उपशास्त्रीय आणि दुसऱ्या भागात अभंग, देशभक्तीची गीते, भावगीत, भक्तीगीत तसेच हिंदी चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित जुनी गाणी तसेच महाराष्ट्राची लावणी आणि गुजरात, बंगाल, काश्मीर, राजस्थान, गोवा या राज्यांमधील लोकसंगीत व्हायोलिनवर सादर करणार आहेत. ‘संधीकाली या अशा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सावरे’ अशी वन्समोअर मिळणारी गाणी हे देखील या वाद्यवृंदाचे आकर्षण आहे. देशात अनेक ठिकाणी ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाच्या बाल कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. दि. ८ मे रोजी हा वाद्यवृंद पुण्यात परत येईल अशी माहिती ‘स्वरस्वप्न’च्या संचालिका स्वप्ना दातार यांनी दिली.