शबनम न्युज | पिंपरी
“आम्ही टॉवर लाईनचे दादा आहोत,” असे म्हणत पिंपरीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या कोयता गॅंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही टॉवर लाईनचे दादा आहोत, असे म्हणून दहशत पसरविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली तसेच एका वाहन चालका वर दगडफेक केले. ही घटना शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोग नगर, रुपीनगर टॉवर लाईन, तळवडे येथे शनिवारी (दि. २९) रात्री २ च्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुनील सोपान बरबटे (वय 51, रा. शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोग नगर, रुपीनगर, टावर लाईन तळवडे) यांनी रविवार (दि.३०) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उमेश भारत उदागे (वय 25, रा. लांडेवाडी भोसरी), रोशन रवींद्र सोनवणे (वय 24, रा. पाटील नगर, चिखली) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करून हातात कोयता घेऊन स्वतःची सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरणीच्या उद्देशाने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. तसेच आरोपी आरडाओरडा करीत जात असताना, फिर्यादीने त्यांना हटकले. आरडाओरडा का करता? असे विचारले असता त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगार केली. तू आम्हाला ओळखत नाहीस का? आम्ही टॉवर लाईनचे दादा उमेश उदागे व रोशन सोनवणे आहोत, तू आम्हाला विचारतो का? असे आरोपी म्हणाले. तसेच त्यांनी फिर्यादी यांच्यावर दगडफेकही केली, तसेच आरोपी उमेश उदागे हा कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून येऊन मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींना शिवीगाळ केली. धमकीही दिली, तसेच परिसरातील इतर वाहनांची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेच्या अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.