शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या आवृत्तीच्या सोहळ्याप्रसंगी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या निर्णयावर राजीनामा देऊ नये, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मांडली. त्यानंतर शरद पवार यांच्या या निर्णयावर समिती स्थापन करण्यात आली होती.
समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे काल शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज समितीने त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर शरद पवार हे राहतील. या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनी अध्यक्ष राहावे, असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर समिती आता त्यांचा निर्णय शरद पवारांना कळवणार आहे.