शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात जून महिन्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आषाढी वारी 338 व्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन 2023 श्री क्षेत्र देहू येथून (दि. 10) जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम पिंपरी चिंचवड शहरांमधील आकुर्डी गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी येथे असतो, याही वर्षी पहिला मुक्का आकुर्डी मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी लागणारे सर्वच उपाययोजना महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक ,अध्यक्ष निखिल दळवी यांनी केली आहे.
निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डी मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक, भाविक, भक्त पिंपरी चिंचवड मधून येत असतात. पालखी सोहळा दरम्यान, आकुर्डी परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते, दर्शन करण्यासाठी येणाऱ्या वारकरी, भाविक, भक्त यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था मनपाने करावी, तसेच जागोजागी पिण्याच्या पाण्याची व वापरण्याचे पाण्याची सोय करावी, वारकरी, भाविक,भक्त व नागरिकांसाठी फिरते शौचालयाची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच पालखी सोहळा दरम्यान वारकरी भाविकांसाठी सर्वच ठिकाणी आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच पालखी मार्ग मधील अडचणी लक्षात घेता, पालखी मार्गावरील अतिक्रमण त्वरित हटवावी, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.