शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्यवसाय विकास कोर्स प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारी यांनी कार्यक्रमाची भूमिका व उद्देश याबाबत माहिती दिली. मा. श्री. रोहित पाटील – को फाऊंडर ऑफ C.G.I.T., पुणे. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनातील प्रथम न्यूनगंड काढून टाकला पाहिजे तसेच आपल्यामध्ये जास्तीत जास्त कौशल्य कसे निर्माण करता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. संजय विटकरे – संचालक, सॉफ्टट्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अँड को-फाउंडर ऑफ C.G.I.T., पुणे. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पी.पी.टी. च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांनी सतत कसे तत्पर असावे तसेच विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न होण्यासाठी नेहमी कसे प्रयत्नशील असावे यासंदर्भात विविध उदाहरणासह सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हंसराज थोरात यांनी व्यवसाय व्यवस्थापनामध्ये प्रसिद्ध राजकीय विचारवंत ल्युथर गुलिक यांनी मांडलेला POSDCORB सिद्धांताचा संदर्भ देत नियोजन, संघटन, समन्वय,दिशादर्शन,प्रेरणा,समन्वय आणि बजेट हे घटक व्यवसायामध्ये कसे महत्वपूर्ण असून व्यवसाय करतांना संगणक ज्ञान आणि स्किल यावर विद्यार्थ्यांचे लक्षकेंद्रित करीत पदवीनंतर महाविद्यालयीन तरुणांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत यासंदर्भात विविध उदाहरणाचे दाखले देत बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय बी.बी.ए. ( सी ए ) विभाग प्रमुख प्रा. शाहूराज येवते यांनी करून दिला तर आभार प्रा. निखिल खांदवे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.