शबनम न्युज | पुणे
पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५मेपासून ऑनलाइन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार असून, दहावीच्या निकालानंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रवेशाची पहिली फेरी होणार आहे. तर ऑगस्टअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या वेळापत्रकानुसार, २० ते २४ मे या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी, प्रवेश अर्ज भरण्यासाठी सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ मेपासून ऑनलाइन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित केला जाईल. २० मेपासून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.