शबनम न्युज | मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एका पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता, खासदार संजय राऊत थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली होती. त्यावर अजित पवारांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांनीही त्यांच्यावर पलटवार केला होता. यासर्व प्रकरणात पुन्हा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी अजित पवारांवर पलटवार केल्यानंतर अजित पवारांनी सयंमी प्रतिक्रिया दिली आहे. “ते काही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतिवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “आपली काही संस्कृती, परंपरा आहे, इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी यशवंतराव साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करू शकतो याबाबत दाखवून दिलं आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, संजय राऊतांची दुसरी बाजू ऐकायला मिळाली की त्यांना कसालतरीही त्रास होतोय. परंतु, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं”, असं अजित पवार काल (२ जून) म्हणाले होते.
त्यांनतर संजय राऊतांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर दिले होते. “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. तसंच “ज्याचं जळतं त्याला कळतं”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. “आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले. यालाच आता परत एकदा अजित पवारांनीही उत्तर दिले आहे.