पिंपरी, : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि रिवेक युवर लाईफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ जून रोजी ‘दहावी बारावी नंतर पुढे काय?’ हा मोफत करियर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जुनी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये, एस. एस. सी. बोर्ड करिअर काऊन्सिलर पुणेचे सहाय्यक सचिव तथा माजी सहाय्यक आयुक्त प्रा. अनिल गुंजाळ, प्रिझम ब्रेन मॅपिंग प्रॅक्टीशनर श्री. विक्रम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला वळण देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतात. आपण कोणते करिअर निवडावे, याबाबत अनेक विद्यार्थी गोंधळलेले असतात. या कार्यक्रमासाठी आपण आपले करिअर कसे निवडावे, त्यामध्ये आनंदी कसे राहावे, याबाबत अनिल गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आपल्या स्वत:ला कसे जाणून घ्यावे याबाबत श्री. विक्रम यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी मोठया संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.