शबनम न्युज | पुणे
रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध मध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिना”च्या निमित्ताने “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. रिया पाटील, योगतज्ज्ञ, पुणे यांनी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले . त्याचबरोबर मानवी जीवन अधिकाधिक निरोगी बनवण्यासाठी योगाचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. “आपले आरोग्य चांगले राहावे; यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून योगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. निरोगी जीवन हेच योगाचे खरे सूत्र आहे. योगा केल्याने माणूस ताणतणावातून मुक्त होतो. तसेच जीवनातील अनेक समस्या त्याला सहज सोडविता येतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात योगा सातत्याने करायला हवे” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा. प्राचार्य, डॉ. अरुण आंधळे यांनी ‘निरोगी जीवन हेच योगाचे रहस्य’ असल्याचे सांगून “योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन, तणावरहित जीवन आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होऊ शकते” असे विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मांडले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना विभाग प्रमुख मा. प्रा. भीमराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशीलकुमार गुजर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. सखाराम शिंगाडे, तसेच प्रा. सभांजी काकडे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.