शबनम न्यूज | भोसरी
पिंपरी चिंचवड शहरात गांजा बाळगून गावठी हातभट्टी पासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्यास भोसरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ओमकार महादेव लिंगे (वय 25, रा. एसटी रोड, दापोडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 9 किलो 622 ग्राम वजनाचा गांजा, 2,360 देशी दारू टॅंगो पंचच्या बाटल्या, 900 मोकळ्या बाटल्या, लेबले व बाटल्याची झाकणे, 140 लिटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 3 लाख 55 हजार 541 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले असून, तपासादरम्यान भोसरी पोलीस स्टेशनच्या परिसरात एक इसम गांजा बाळगून गावठी हातभट्टी पासून बनावट देशी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. तसेच त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस ऍक्ट, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ ,पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक पाटील, पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोरे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार राकेश भोईने, संजय चव्हाण, पोलिस अंमलदार सचिन गारडे, मच्छिंद्र कांबळे, राजेंद्र राठोड, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, संतोष महाडिक, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील यांनी केली.