शबनम न्यूज | चंद्रपूर
रुग्णालयात उपचाराकरीता आलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर वेदना असतात. मात्र उपचार केल्यानंतर परत जाताना त्याच्या चेह-यावर आनंद आणि समाधान दिसेल, या भावनेने आरोग्य केंद्रावर काम व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राजोली (ता.मुल) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व गिलबिली (ता. बल्लारपूर) येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी श्री. थेरे, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, संध्याताई गुरनुले, राहुल पावडे, अलका आत्राम, नामदेव डाहुले, आनंदराव पाटील ठिकरे, चंदुभाऊ मारगोनवार, जयश्री वलकेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्रास भेट दिली असता डॉक्टर पावसात छत्री घेऊन रुग्णांची तपासणी करीत असल्याचे नजरेस पडले. त्यावेळी या आरोग्य केंद्राची बांधणी करण्याचा संकल्प केला. या आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी अनेक संकटे होती. जमिनीचा प्रश्न होता. मात्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाने पूर्ण करण्याचा भाव मनात होता. आज राजोली येथे अप्रतिम, अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार झाले आहे.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे मंदिर व्हावे. जिल्ह्यामधील आरोग्यसेवा बळकट व्हाव्यात, यासाठी मी नेहमी आग्रही आहे. निधी उपलब्धतेसाठी राजोली तसेच मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मानोरा, कळमना, ताडाळी, बेंबाळ, जिभगाव, नांदाफाटा, भंगाराम तळोधी, विरुर स्टेशन, शेगांव, नान्होरी, उमरी पोतदार, गांगलवाडी, शेणगाव व सावरी अशा एकूण 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालयासारखे आहेत. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण झाले असून रुग्णसेवेत कार्यान्वित आहे. घुग्गूस येथील ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष बाब करून या रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.