शबनम न्युज | पेण (वृत्तसंस्था )
रायगड मधील पेण येथील एका बारा वर्षे मुलीला साप चावल्यानंतर चार दवाखाने फेकल्यानंतरही उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. सारा रमेश ठाकूर असे त्या मृत मुलीचे नाव आहे. सारा हिला सर्पदंश झाल्यानंतर मंगळवार रात्री रात्रभर चार रुग्णालयाचे उंबरठ झिंजवले, तरी उपचार न मिळाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.
सारा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेली असताना, एका विषारी सर्पाने दंश केला. तिच्या वडिलांनी तिला तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराचे साधने नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथील एका खाजगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांनी अलिबाग सिविल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अलिबाग रोड रुग्णालयाने ही उपचार करण्यास असमर्थ दर्शवली. शेवटी तिला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मावळली होती.
साराच्या आईचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. वडील लेकीला जीवापाड सांभाळत असताना, तिला सर्पदंश झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत लेकीला वाचविण्यासाठी तिचे वडील धडपड करत होते. मात्र त्यांना यश आले नाही. दर्जेदार आरोग्य सेवा असा दावा करणाऱ्या राज्याच्या आरोग्य विभागाचे डोळे कधी उघडतील असा सवाल या घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे.